मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 15 जुलैला घोषित केलेले राज्यव्यापी साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी दोन प्रमुख मागण्या मान्य केल्याने हे उपोषण पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, उर्वरित मागण्या 15 दिवसांत मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी शिंदे समितीला मुदतवाढ दिली असून, तिन्ही गॅझेट स्वीकारण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यापुढे घोषणांऐवजी प्रत्यक्ष कृती दाखवावी, अशी अपेक्षा मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे. "रेकॉर्ड शोधा, अभ्यासक द्या आणि रेकॉर्ड शोधायला लावा," अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. सरकारने गॅझेटऐवजी शासन निर्णयात गॅझेटियर करावे, असेही त्यांनी सांगितले.
साखळी उपोषण पुढे ढकलले
मराठा समाजाच्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी 15 जुलै रोजी राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सरकारने दोन मागण्या मान्य केल्याने हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, "उर्वरित दोन मागण्या 15 दिवसांत मान्य करा. फेब्रुवारी अखेरपर्यंत त्या पूर्ण होण्याची आवश्यकता आहे."
22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान अंतरवाली किंवा शहागड येथे छत्रपती भवन येथे राज्यातील मराठा समाज बांधवांनी आपल्या अडचणी घेऊन यावे, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजातील लोकांनी गावा-गावात सेवक म्हणून काम करावे आणि समाजातील गरिबांना त्याचा फायदा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संतोष देशमुख प्रकरणातील मागणी
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. "एका बड्या नेत्याचे नाव यात आहे, पण ते समोर येत नाही. आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा," असे ते म्हणाले. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती अद्याप न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. "आरोपींच्या मालमत्ता ईडीच्या चौकशीत जप्त करा. रोज नवे धक्कादायक तपशील बाहेर येत आहेत, तरीही आरोपी मोकाट फिरत आहेत," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडे प्रकरणातील आरोप
धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीचे आरोप झाले असताना सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. "निवडून आलात म्हणून लाट नाही. मुंडे नावाचा वास सुटलेला आहे. लोकांच्या मनातील चीड वाढू देऊ नका. आम्ही संयम पाळतोय, पण तो सुटला तर परिणाम गंभीर होतील," असा इशारा त्यांनी दिला. "सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे, अशी शंका आम्हाला येते," असेही ते म्हणाले.
महादेव मुंडे यांच्या पत्नीनेही यावेळी इशारा दिला. "जर आवश्यक झाले तर मी त्यांच्या पाठीशी उभे राहीन," असे त्या म्हणाल्या.
सरकारला ठाम पावले उचलण्याचा इशारा
"सरकारने मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. घोषणा नाही, तर कृती अपेक्षित आहे. समाज एकवटला आहे आणि मराठा समाजाचा संयम सुटला, तर परिस्थिती गंभीर होईल," असे जरांगे यांनी सांगितले.